घोरगे हे घाटंजी पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. अलीकडेच ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्ताच्या निमित्ताने जिल्ह्यातील 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोरगे यांना घाटंजी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी धर्मशाळा वार्डातील फटाका व्यावसायिकाला हेरले. फटाक्याची अनधिकृत विक्री, साठेबाजी यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाकडून धाड टाकली जाऊ शकते, कठोर कारवाई होऊ शकते अशी भीती दाखवून सहा लाखांची मागणी केली.
तडजोडीमध्ये एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. व्यावसायिकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरुन पोलिसांनी घाटंजी पोलीस ठाण्यात सापळा रचला. पोलीस ठाण्यातील भरोसा सेलमध्ये तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयाची लाच घेताना राजाभाऊ घोगरे यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, पोलीस कर्मचारी सचिन बोयर, गेडाम, वसीम शेख यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.