मुंबई : ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला शासनाकडून स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. तसेच, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. या निर्णयाला आता राज्य सरकारनेच स्थगिती दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे आणि त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शाळा तुर्तास सुरू करु नयेत असा प्रवाह काही मंत्र्यांमध्ये दिसून येत आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत देखील शाळा सुरू न करण्याची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.