सत्तासंघर्ष: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण साठी 2000 कोटींचा सौदा अन् व्यवहार; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

0

मुंबई: केंद्रीय ठाकरे गटाला धक्का देत, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळी लिहिलेल्या आहेत. “ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” त्यासोबतच संजय राऊत यांनी कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत.

माझी खात्रीची माहिती आहे….
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b

— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “माझी खात्रीची माहिती आहे…. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत… हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..”

शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे, शिवसेनेला संपवण्यासाठी करण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला होता.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यभरातील शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, ठाकरे गटाचे अनेक नेतेही केंद्रीय निवडणूक आयोगासह शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र डागत आहेत. अशातच संजय राऊतांनी ट्वीट करत निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.