मुंबई : 2019 ला काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. निवडणूक आयोगाच्या निर्णय हा बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्याना मोठी चपराक आहे असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि पक्षचिन्ह दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करीत शिंदे गटावर आसूड ओढला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर प्रत्युत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दर्शनासाठी आल्यानंतर एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सत्याचा विजय झाला. बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला. आनंद दिघेंच्या विचारांचा विजय आहे. लोहशाहीचा विजय आहे.
सीएम शिंदे म्हणाले, या देशात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर आपला कारभार चालतो. हा विजय बहुमताचा आणि लोकशाहीचा विजय आहे. पन्नास आमदारा, तेरा खासदार, जि. प. सदस्यांपासून लाखो कार्यकर्ते, शिवसैनिकांचे मी अभिनंदन करतो.
सीएम शिंदे म्हणाले, कुणी कितीही काही म्हटले तरी सत्य कुणालाही लपवता येणार नाही. टाळता येणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विजय आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार कुणाच्या तरी दावणीला बांधले. विचार विकण्याचे पाप केले त्यांना ही मोठी चपराक आहे.
सीएम शिंदे म्हणाले, त्यांना त्यांची जागा आजच्या निकालाने दाखवून दिली. त्यांनी तर हे पूर्वीच मान्य केले होते की, धनुष्यबाण गोठवले जाईल. परंतु, त्यांनी २०१९ ला धनुष्यबाण राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडे गहाण ठेवला होता त्यांच्याकडून मी सोडवला. केविलवाणा प्रयत्न आहे. सहानभुती मिळवण्याचा, आपले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत.