मुंबई : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर राज ठाकरे आणि निवडक मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे आज शिवतीर्थवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून वाद निर्माण झाला असताना आता मनसेनं एक पाऊल मागे घेत रमजान ईद निमित्त आज नियोजित असलेला महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला. स्वतः राज ठाकरे यांनी ट्वीट करुन असं करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना आदेश दिले. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी माझ्या ट्वीटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असं राज यांनी म्हटलं. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर राज ठाकरे कोणती नवी घोषणा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या संदर्भात पोलिसांकडून दोन अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाची स्पेशल ब्रँच आणि एसआडीच्या औरंगाबाद शाखेनं हे अहवाल तयार केले आहेत. हे अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात येतील अशी माहिती औरंगाबादचे आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. या अहवालानंतर आता राज ठाकरेंवर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर झालं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. अशातच औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 अटी-शर्तींवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती. या अटी-शर्तींचं पालन मनसेच्या सभेत झालं की नाही याची पडताळणी देखील पोलीस करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य केलं का? त्यांच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार करण्यात येईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करणार आहेत.