नाशिक : देशभरातील किरकोळ बाजारात कांदा भलेही प्रतिकिलो १५ ते २५ रुपये विकला जात असेल; परंतु नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा २ ते ४ रुपये किलो विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा ओघ कायम आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या हंगामात त्यांना घाऊक बाजारात २० रुपये किलो दर मिळाला होता.
देशातील सर्वाधिक कांदा उत्पन्न होणाऱ्या लासलगाव, पिंपळगावातील शेतकरी या वर्षी नफ्यापेक्षा नुकसानीचा हिशेब करीत आहेत. लासलगावात कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी अनिल पवार म्हणाले, एक एकरात सुमारे ५० क्विंटल कांदा असतो. त्यावर ४० ते ५० हजार रुपये खर्च होतो. सध्याचा दर पाहता ५० क्विंटल कांद्याला केवळ १० हजार रुपये मिळतील. यामुळेच शेतकऱ्यांनी सोमवारी लिलाव बंद पाडला.
या वर्षी देशभरात कांद्याचा पेरा १० % वाढला, परंतु हवामान उत्तम असल्याने बंपर उत्पादन झाले. खराब हवामानामुळे सरासरी ३०-४०% पीक वाया जाते. गेल्या काही वर्षांत मार्चअखेरपर्यंत रब्बी हंगामातील कांदा येण्यापूर्वी जानेवारी-फेब्रुवारीत हंगामपूर्व कांद्याला चांगला दर मिळतो, असे दिसून आले आहे. या वर्षी मात्र बाजार समितीमध्ये याच कालावधीतील आवक ४०% वाढली आहे. या हंगामात कांदा कच्चा असतो. त्यामुळे तो दीर्घकाळ साठवता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने िमळेल त्या भावात कांदा विकावा लागत आहे. मार्चअखेरीस येणारा कांदा प्रदीर्घ काळ टिकाऊ असतो आिण सरकारही खरेदी करते. एकूण वार्षिक उत्पादनापैकी ६५ % कांदा हा मार्च महिन्याच्या हंगामातील असतो.
कांद्याला प्रतिकिलो २ रुपयांपेक्षाही कमी दर कमी मिळत असल्याने सोमवारी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले. अखेर मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून मिळाल्यानंतर १० तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.