वैकुंठ स्मशानभूमीमधून होणा-या वायूप्रदुषणाविरोधात नवी पेठेतील सहा सोसायट्यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका
पुणे : वैकुंठ स्मशानभूमी येथून होणा-या वायुप्रदूषण विरोधात आता नवी पेठेतील सर्व सोसायट्या एकवटल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात सहा सोसायट्यांनी एकत्रित येऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. आमचा परिसर आम्हाला प्रदूषणमुक्त हवा आहे, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
नवी पेठेतील आनंदबाग को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सुंदरबन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, फाटक बाग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, प्रणव कोआॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, द सत्संग को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड आणि अनुपम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड या सहा सोसायटींच्या सेक्रेटरी आणि अध्यक्षांनी मिळून ही याचिका दाखल केली आहे. पुणे महानगरपालिका, महापालिकेचा विद्युत विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य शासन आणि आरोग्य विभाग यांना त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. अॅड असीम सरोदे, अजिंक्य उडाणे, अॅड. अजित देशपांडे व अॅड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी देखील यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या आहेत मागण्या :
या चिमणीची क्षमता जर संपुष्टात आली असेल तर त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले पाहिजे. प्रदूषणावर नियंत्रण
आणणारी यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. महापौरांच्या टीमने वैकुंठ स्मशानभूमीला भेट दिल्यानंतर अजून तीन मशिन्स इथे आणणार आहेत असे सांगितले. मात्र वैकुंठातच का? असा आमचा प्रश्न आहे. पुण्यात 21 स्मशानभूमी आहेत. आधीच वैकुंठ स्मशानभूमीवर प्रचंड ताण आला आहे. ही स्मशानभूमी मध्यवर्ती भागात आहे. सध्याच्या धुराच्या प्रदूषणावर नियंत्रण
न आणता अजून ताण वाढवला जात आहे. जशी लोकसंख्या वाढत आहे तशा स्मशानभूमीच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. मात्र त्याचा विचार केला जात नाही. ज्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीची सुविधा नाही तिथे ही
यंत्रणा कार्यान्वित करायला हवी. एकाच स्मशानभूमीवर लक्ष्य का केंद्रित केले जात आहे?. सर्व स्मशानभूमीमध्ये क्रमाक्रमाने शव अंत्यसंस्कारासाठी पाठवावीत म्हणजे एकाच स्मशानभूमीवर ताण येणार नाही. आम्हाला प्रदूषणमुक्त
करा आणि वैकुंठ स्मशानभूमीवर ताण देऊ नका ही आमची मागणी आहे.
कोट :
वैकुंठ स्मशानभूमीतील सततच्या वाढत्या
धुराच्या प्रदूषणामुळे आसपासच्या
सोसायट्यांमधील दोन ते तीन हजार नागरिकांसह निवारा वृद्धाश्रममधील ज्येष्ठ नागरिकांना देखील याचा त्रास होत आहे. स्मशानभूमीतील चिमणी आणि मशिन्स जुने झाली असून, त्याची योग्यप्रकारे देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे चिमणीमधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत आहे. प्रदूषणावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाहीये.
सुमीत सबनीस, याचिकाकर्ते