पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या ( दि.३०) संपुष्टात येत आहे. मात्र आद्यप प्रभाग रचना व परिशिष्ठांचे कामच पूर्ण न झाल्याने आराखडा सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे निवडणूक अधिकारी उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर नोव्हेंबर च्या पहिल्याच आठवड्यात 30 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. विशेष असे की हा निर्णय झाल्यानंतर लोकसंख्या वाढीनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या सततच्या बदलणार्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना व अन्य तांत्रिक बाबींमध्ये विलंब होत गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच मागील आठवड्यात पुण्यासह,।पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद या तीन महापलीकांनी कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.
प्रभाग रचनांमध्ये राजकीय हस्तक्षेप ही नवीन गोष्ट राहिली नाही. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. या तीनही पक्षही राज्यातील विविध महापलिकात बलस्थाने आहेत. त्यामुळे एकमेकांना जोखत पूर्वी सत्ता असलेल्या महापालिकांत सत्ता स्थापन करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.