जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ शहरातील जामनेर रोड भागातील पाच अवैध धंद्यांवर छापे टाकले. यामध्ये एक धंदा भाजप नगरसेवक चालवत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये नऊ संशयितांना अटक केली असून ५२ हजार ८० रुपयांच्या रोकडसह सट्टा जुगाराची साधने जप्त केली.
काही संशयित फरारी झाले असून, संशयितांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे, यात भाजप नगरसेवकाच्या जुगारअड्ड्यावर झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील सट्टा, जुगारअड्ड्यांवर छापे टाकले. सट्टा, जुगाराची साधने, तसेच ५२ हजार ८० रुपयांची रोकड जप्त केली. पहिली कारवाई नाहाटा चौफुली, दीनदयालनगराजवळून संशयित कृष्णा महालेकर (रा. नेब कॉलनी, भुसावळ) व संदीप अशोक चौधरी (दीनदयालनगर, भुसावळ) याच्या ताब्यातून १४ हजार ५०० रुपयांची रोख व सट्टा व जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
दुसरी कारवाई अष्टभूजा मंदिर परिसरात करण्यात आली. चार हजार १८० रुपयांच्या रोकडसह संशयित रवींद्र रामदास वारके (हनुमाननगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. तिसरी कारवाई सोनिच्छावाडीजवळ कृष्णानगरात करण्यात आली. संशयित संतोषलाल गिरीलाल (खडका रोड, भुसावळ) व गोपाल द्वारकादास अग्रवाल (शनिमंदिर वॉर्ड, भुसावळ) यांच्या ताब्यातून दहा हजार ९८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
चौथी कारवाई सोनिच्छावाडीजवळील चहा टपरीजवळ करण्यात आली. संशयित आरोपी प्रल्हाद हरी सपकाळे (दीनदयालनगर, भुसावळ) व छोटेलाल ब्रिजलाल (गांधीनगर, भुसावळ) यांच्या ताब्यातून दहा हजार ९२० रुपयांची रोकड व सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. पाचवी कारवाई सोनिच्छावाडी नगरजवळ करण्यात आली. संशयित संतोष शंकर तायडे (तुळशीनगर, भुसावळ) व मारोती वेडू भालेराव (शिवपूर कन्हाळा, भुसावळ) यांच्या ताब्यातून ११ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.