पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस

0

पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने  दिला आहे. गुजरातसह उत्तर महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील तापमानात घट होत असल्याने डिसेबरपासून पुन्हा थंडीचा अमल सुरु होण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे स्वेटर घालून सकाळी बाहेर पडण्याचा विचार केला जात होता. मात्र, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे स्वेटर ऐवजी आज रेनकोट, छत्री घेऊन घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले काही दिवस तामिळनाडु, आंध्र प्रदेशाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अशातच आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या भागापासून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

यामुळे संपूर्ण कोकण तसेच मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट आले आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या हलक्या सरी सुरु झाल्या आहेत. मुंबईतही पहाटेपासून पाऊस सुरु झाला आहे.
सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुणे शहरात पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाबरोबरच अंगाला झोंबणारे थंडगार वारे वाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी किमान तापमानात घट होऊन ते १२ अंशापर्यंत खाली आले होते.

त्यामुळे थंडीचा कडाका आता सुरु होणार असले वाटत असतानाच पुन्हा ढगाळ हवामान आणि पाऊस यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी पुणे शहरात १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरासह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वत्र सध्या ढगांचे अच्छादन असून अनेक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. पुणे शहरात पुढील ३ दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचवेळी पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांना  ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अंदमान समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचे पुढे ३ डिसेबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणेत पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.