सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

0

सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे. राजेश काळे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. काळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा, मारहाण असे 7 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्च आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणात राजेश काळे यांना अटक देखील करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राजेश काळे हे महापालिकेत आर.के. या नावाने ओळखले जातात.

राजेश काळे यांच्यासह चेतन गायकवाड यालाही सोलापूर, उस्मानाबाद आणि इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. गायकवाड याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे ते पुत्र आहेत. आज (बुधवार) पहाटे पाच वाजता उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही कारवाईला पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दुजोरा दिला आहे.

आपल्यावर राजकीय द्वेषातून यापूर्वी अनेक खोटे आरोप झाले असून ही कारवाई देखील राजकीय द्वेषातूनच करण्यात आली आहे. याप्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे राजेश काळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.