या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाउनमध्ये अन्न धान्य घेण्यासाठी पीडित महिला सुनील वाघमारे यांच्या घरी गेली होती. यावेळी संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केलाय.
त्यानंतरदेखील दोन वेळा वाघमारे याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेचे म्हणणं आहे. या घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करायचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता, असे पीडितेने आपल्या अर्जात म्हटलंय. त्याचबरोबर याबाबत कुठेही वाच्यता केली तर वाघमारेने जिवे मारण्याची धमकी दिली होती.
अखेर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी सुनील वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे दुपारपासून ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बसली होती, त्याचवेळी आरोपी सुनील वाघमारे याला चौकशीसाठी पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये आणून बसवले होते. मात्र, रात्री अचानक सुनील वाघमारे पोलीस स्टेशनमधून पसार झाला.