११ हजार ४४३ पोलिसांच्या भरती प्रक्रियेस सुरुवात

0

मुंबई : राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये रिक्त झालेली पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार ११ हजार ४४३ पोलिसांची भरती केली जाईल. भरती प्रक्रियेला गृह विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. शासनाच्या आदेशानंतर जिल्हा व विभागानुसार रिक्त पदांची माहिती गृह विभागाकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेला गती येईल.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस दल अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस भरती करण्याची घोषणा नुकतीच केली होती. त्यानुसार सन २०२१ मध्ये महाराष्ट्रातील विविध ३६ जिल्ह्यांमध्ये सुमारे ११ हजार ४४३ पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे अल्प मनुष्यबळावर पोलिस दलाची मदार आहे. हे केवळ एका जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे चित्र आहे. त्यामुळे गृह विभागाने रिक्त झालेल्या ११ हजार ४४३ पदांच्या भरतीला मंजुरी (शासन निर्णय क्र. पोलिस ११२२/प्र.क.२२/पोल-५अ) दिली आहे. शिवाय ही सर्व पदे एकाच वेळी अर्थात १०० टक्के भरावी, असेही आदेशात म्हटले आहे. त्यातून पोलिस शिपाई, पोलिस चालक व सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. याविषयी आढावा घेण्यासाठी वारंवार बैठका घेण्यात आल्या. तसेच २७ सप्टेंबरला मंत्रिमंडळाने भरतीला मान्यता दिली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गृह विभागाने रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात सन २०२२ मध्ये किती पोलिस कार्यरत आहेत, गेल्या वर्षी २०२१ मध्ये किती पदे रिक्त झाली, वर्षभरात किती पोलिस निवृत्त होतील, आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक कर्मचारी, स्वेच्छानिवृत्तीसाठी आलेले अर्ज यांचा एकत्र विचार होईल. त्यानंतर भरतीची संख्या निर्धारित होईल व वरिष्ठांना कळवण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.