अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घरातून रिव्हॉल्व्हर आणि इतर काही वस्तू जप्त केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे. जरे यांच्या हत्याकांडाचा उलगडा होताच बोठे फरार झाला असून तो परदेशात पळून जाऊ नये, म्हणून यासाठी पोलिसांनी विमानतळ व्यवस्थापनांना बोठे याच्याबाबतची लुकआउट नोटीस जारी केली आहे.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली होती. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या हत्येची सुपारी बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील भिंगारदिवे याला अटक झाली असून, बोठे मात्र फरार झाला होता. फरार होताना त्याने त्याचे मोबाईल घरीच ठेवले होते. पोलिसांनी मोबाईल जप्त केले असून, बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी 5 पोलीस पथके रवाना केली आहेत. शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या आणि एलसीबीच्या पथकाने बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्द या बंगल्याची झडती घेतली.
यावेळी पोलिसांना बाळ बोठे याचे रिव्हॉल्व्हर आढळून आले आहे. बाळ बोठे याच्याकडे शस्त्र परवाना आहे, तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही पोलिसांच्या झडतीत आढळल्या आहेत.
Prev Post