मुंबई : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे.
१ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग सुरू होईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी अमरावती भेटीत केली होती. खरे म्हणजे १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी तर १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरू होणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली होती. मात्र, कोरोनामुळे मधली दोन वर्षे काम लांबले. १ मे रोजी नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरू होणार होता. नंतर नागपूर ते वाशिम अशा २१० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. नंतर तेही दाेन महिने पुढे गेले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावती दौऱ्यात समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे ३४७ किमीच्या कामाचा आढावा घेतला होता.