मुंबई : परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार 297 कोटींची शेतकऱ्यांना मदत दिली होती. आता राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार 211 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा करुन ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली. राज्य सरकारने त्यासाठी कर्ज काढून मदतीचा पहिला हप्ता दिला. ‘खचू नका धीर, ठाकरे सरकार आहे खंबीर’ म्हणत मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला.
केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले असतानाही राज्य सरकारने त्याची वाट न पाहता बळीराजाला मदत दिली. दरम्यान, आता केंद्र सरकारकडे सुमारे अडीच ते तीन हजार कोटींची मदत मागितली जाणार असून तसा प्रस्ताव तयार केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी, मदतीची रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करु नये, अशा सक्त सूचनाही राज्य सरकारने बॅकांना दिल्या आहेत.
Prev Post