बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून, सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे.
मागील तीन दिवसांपासून तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढला होता. त्यानंतर आज अचानक तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकरांच्या या कृतीने एकच खळबळ उडाली आहे.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते.
मात्र नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार ? हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली.
दरम्यान केलेल्या घोषणांमुळे संपूर्ण पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावली असली, तरी गेल्या चार दिवसापासून ते भूमिगत आहेत. मुंबई आणि बुलडाणा पोलिस मागावर असले तरी त्यांचा पत्ता मात्र अजूनही लागला नाही. आज ११ वाजता तुपकर नेमके कुठे पोहोचतील? हे सांगता येत नाही.