नंदुरबार : अश्लील व्हिडिओ कॉल करुन तसेच ते रेकॉर्ड केल्याचे भासवून लोकांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणार्या महिलेसह पत्रकार अणि पोलीस यांच्याबरोबर आणखी दोन मुलींची साथ असल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेने अनेकांना फसविले असल्याचे आढळून येत असून तिच्याविरुद्ध तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत.
शहादा तालुक्यातील ४३ वर्षाच्या नागरिकाला महिलेने अश्लील व्हिडिओ कॉल करुन त्याला जाळ्यात ओढले होते. पोलीस मुख्यालयातील छोटूलाल शिरसाठ याने मध्यस्थी करीत असल्याचे दाखवून त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळले. त्यानंतर तथाकथित पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) यानेदेखील तक्रारदार यांना पुन्हा ९ लाखांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित महिला, पोलीस कर्मचारी छोटूलाल शिरसाठ व पत्रकार अतुल थोरात याला अटक केली. शिरसाठ याला निलंबित करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरातील एका ४१ वर्षाच्या बांधकाम व्यावसायिकाला महिला व तिच्या दोन साथीदारांनी अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली होती.
नंदुरबारमधील खंडणी उकळणार्या महिलेचे कारनामे समोर आल्यानंतर गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर येथील ६७ वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिकांनी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली. तक्रारदार यांना या महिलेने अश्लिल व्हिडिओ कॉल केला. तिची महिला साथीदार, गोविंदा व बॉबी यांनी दोन ते अडीच महिन्यापूर्वी तक्रारदार यांचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता. तो अश्लील व्हिडिओ तक्रारदार यांच्या नातेवाईकांना व सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच खंडणीचे पैसे देत नाही तोपर्यंत त्यांनी तक्रारदार यांना या महिलेच्या घरात डांबून ठेवले होते. खंडणीच्या १० लाखांपैकी ३० हजार रुपये दिल्यानंतर त्यांची सुटका केली होती. ही रक्कम घेतल्यानंतरही त्यांचा अश्लील व्हिडिओ व फोटो निझर येथील त्यांचे नातेवाईक व गावातील व्हॉटसअॅपवर प्रसारीत केले होते. त्यामुळे तक्रारदार व्यथित होऊन राहते घर व गाव सोडून परजिल्ह्यात निघून गेले होते. या महिलेला पकडल्याची बातमी वाचल्यानंतर त्यांनी नंदुरबार पोलीस अधीक्षकांकडे येऊन तिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
खंडणी उकळणारी महिला व तिच्या कथित पत्रकार व पोलीस साथीदारांसह दोन मुली या गैरकृत्यात सहभागी असल्याचे समोर आले होते. यात आता आणखी दोघांची भर पडली आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांना यापूर्वीच तडीपारीचा आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही दोघांच्या कारवाया सुरु होत्या. संबंधित महिलेविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नंदुरबार तसेच इतर राज्यातील नागरिकांना अशा प्रकारे अश्लील व्हिडिओ कॉल करुन व बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील, अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येऊन पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.