जळगाव : खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत. ‘लेकीन बदनाम वो होते है जो बदनामी से डरते है हम तो व बदनाम है बदनामी हमसे डरती है’, अशी स्पष्ट कबुली शिंदे गटाचे मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका जाहीर कार्यक्रमात भाषण करताना दिली. आमदार पैसे घेऊन गुवाहटी गेले, असा आरोप करणारे अमरावतीचे आमदार रवि राणा यांच्यावर तोफ डागताना गुलाबराव म्हणाले, तीन-चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून इकडे आलेले लोक आमच्यावर टीका करत आहेत. तू सिद्ध करून दाखव कुठे झाले आहे.
महाविकास आघाडीवर टीका करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पाण्यामध्ये राजकारण न करता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना व उद्धव ठाकरेवाले सर्वांनी पाणी प्या आणि मैदानात या. पाण्यात जात, धर्म, पंथ पाहायचा नसतो हे कोरोना काळात सर्वांनी अनुभवले आहे. मात्र कोरोना काळात माणसांची एकजूट पाहायला मिळाली.
सध्याच्या राजकीय स्थितीवर गुलाबराव पाटील म्हणाले, पाण्याच्या कामात इमानदारी पाहिजे. मात्र आजच्या काळात प्राथमिक शिक्षक व मिल्ट्री मधला माणूस हेच इमानदार आहेत बाकी माझ्यासह कुणीही इमानदार नसून सद्यस्थितीत शिट्टी मारली की पैसे, आजा मेरी गाडी मे बैठ जा… अशी परिस्थिती आहे.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मी गावरान माणूस असून दादा कोंडकेचा पिक्चर पाहणारा माणूस आहे. त्यामुळे डबल अर्थी बोलणारच तसे नाही बोललो तर मंत्र म्हणण्यासारखे होईल. योगायोगाने चुकून या धंद्यात आलो मी कीर्तनकार असतो तर यापेक्षाही मोठी गर्दी झाली असती. पण बाळासाहेबांच्या कृपेने आपले दुकान बरे चालले आहे.
विरोधकांना इशारा देताना पाटील म्हणाले, पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा राजा व्हायचा. मात्र आता राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही, तर राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो, त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. पन्नास हजार मतांनी आम्ही निवडून आलेलो आहोत. म्हणून तर कोणी ऐरे गैरे नथ्थू खैरे आम्हाला पाडून टाकू असे बोलत आहेत. मात्र शंभर दिवस हिजड्यासारखे जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखा जगा हेच शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले आहे.