शिंदेचा व्हीप ट्रॅप; अधिवेशनात अडचणी वाढवणार

0

 

मुंबई : शिवसेना व धनुष्यबाण चिन्हावर अधिकार प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या १५ आमदारांना ‘व्हीप ट्रॅप’मध्ये अडकून अपात्रतेची कारवाई करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या वेळी व्हीप जारी करून बैठक बोलावणार असल्याचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले. त्याला ठाकरे गट हजर राहणार नाहीच. या १५ आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावून विधानसभा अध्यक्षांमार्फत कारवाई करण्याची रणनीती आ‌खली जात आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी १५ आमदार व सहा खासदारांची बैठक घेतली, त्यातही हा मुद्दा चर्चेस आला होता. त्या वेळी आयोगाच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने शिंदे गटाच्या व्हीपचा परिणाम होणार नाही, असे ठाकरेंकडून सांगण्यात आले.
विधिमंडळ निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे म्हणाले, ‘शिंदेंचा व्हीप दुसऱ्या गटाला लागू होईल की नाही हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील. त्यांनी मान्यता दिली तर ठाकरे गट कोर्टात जाऊ शकेल.’ दरम्यान, आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी शिंदेंनी कॅव्हेट दाखल केले.

आमचा धनुष्यबाण चोरीस गेला. उद्या ते ‘मशाल’ काढून घेतील. रावणाने धनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला होता. पण तो उताणा पडला. हे शिवधनुष्यही तुम्हाला उताणे पाडेल आणि तुमच्या छाताडावर भगवा फडकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. लढाई आता सुरू झाली आहे. मी खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. लवकरच निवडणुका लावतील, तयार राहा. आपल्याला चोरांचा आणि चोरांच्या मालकांचा नायनाट करायचा आहे.
उद्धव ठाकरे

 

‘मातोश्री’बाहेर शनिवारी मोठ्या संख्येने ठाकरे समर्थक जमले होते. उद्धव ठाकरेंनी बाहेर येऊन कारच्या रूफटॉपवर उभे राहून त्यांना मार्गदर्शन केले. १९६९ मध्ये पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी कारच्या टपावर उभे राहून असेच भाषण केले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.