सोलापूर : कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी तपासणी सुरु आहे. याच तपासणी दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार बालकांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. यातील 20 बालकांना कोरोना झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
स्वामी म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून यामध्ये बालके बाधित होण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. येत्या काळातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. ग्रामीण भागातील 9 लाख 77 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
तपासणी मोहिमेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 20 मुले कोरोना पॉझीटिव्ह सापडली असून त्यांच्यावर डॉक्टराच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत, शिवाय विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये ताप, सर्दी तसेच खोकला अशी कोरोनासदृश लक्षणे सुमारे 15 हजारांवर मुलांच्यात आढळून आली आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असून पालकांनी स्वच्छतेची काळजी व कोरोनाची दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.