सातारा : साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही आत्महत्या की हत्या? याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सणबूर येथील आनंद पांडूरंग जाधव (75) यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनंदा आनंद जाधव (65), मुलगा संतोष आनंद जाधव (45) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस हे गुरुवारी रात्री आपल्या राहत्या घरात झोपले होते. त्यांचे शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळले.
गत काही दिवसापासून आनंद जाधव आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तेथून घरी आणण्यात आले. रात्री सणबूर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली होती.
विवाहित कन्या पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली. शुक्रवारी त्याने पुन्हा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी शेजारच्या व्यक्तींशी संपर्क साधून घरी विचारपूस करण्याची विनंती केली. त्यानंतर काही जणांनी घरी जावून दरवाजा ठोठावला असता त्यांनाही कोणता प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर त्यांनी शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास दरवाजा तोडून आत पाहिले असता चारही जणांचे मृतदेह अंथरुणावर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.