धक्कादायक….सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटूचा मृत्यू

0

सातारा: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू असलेल्या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय दर्जेचा टेबल टेनिस खेळणारा खेळाडू म्हणून परिचित होता.

यंदा प्रचंड मोठ्या संख्येत सातारा मॅरेथॉन पार पडली. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तैनात होत्या. मॅरेथॉन सुरू होऊन एक तासही पार पडला नव्हता. तोच राजक्रांतीलाल अर्धे अंतर करून पार झालाही नव्हता तोच येवतेश्वर डोंगराच्या धावमार्गावर पडला.

तातडीने त्याला मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर असलेल्या यशवंत हॉस्पिटलला हलवले मात्र त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे काहींनी सांगितले. त्यांनंतर मृतदेह जिल्हा सरकारी दवाखान्यात हलवून शवविच्छेदन करण्यात आले पण मृत्यूचे नक्की कारण समजू शकले नाही.

मॅरेथॉन ऐन रंगात आली असतानाच ही दुर्घटना घडली. संयोजकांमध्ये बहुतेक डॉक्टर्स असल्याने सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. तातडीने राजक्रांतीलाल याच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून ते सातारा जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत.

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये ही दुर्घटना घडल्याने प्राईज डिस्ट्रीबुशननंतर आयोजकांवर शोककळा पसरली. मात्र देशभरातून आलेल्या धावपटूनी देशांतील सर्वात सुंदर आयोजन आणि अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या सातारा हिल मॅरेथॉनला गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त केली.

याच मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकवलेल्या कोल्हापूरच्या परशुराम भोई यांनी “मॅरेथॉनचे आयोजन उत्तम होते पण ही दुर्घटना व्हायला नको होती” असे म्हणत हळहळ व्यक्त केली.

या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत असतानाच साताऱ्यातील काहींनी कांगावा करत इप्सित साध्य करण्याचा काही काळ प्रयत्न केला होता, हे दुर्दैव असल्याचे स्पष्ट बोलून दाखवत अनेक मॅरेथॉन पटूंनी साताऱ्याचा निरोप घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.