धक्कादायक… देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

0

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या, त्यानंतर तामिळनाडू आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात अशा १,६४,०३३ घटना घडल्या आहेत.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या अहवालानुसार, देशातील आत्महत्यांच्या घटनांमागे व्यावसायिक किंवा करिअरशी संबंधित समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन, आर्थिक नुकसान आणि आजारपणातील तीव्र वेदना ही मुख्य कारणे आहेत. २०२१ मध्ये भारतात एकूण १,६४,०३३ आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. २०२० च्या तुलनेत (१,५३,०५२) या ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर आत्महत्यांचे प्रमाणही ६.२ टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक २२,२०७ आत्महत्या घडल्या. यात तामिळनाडू १४,९६५, म. प्र. १४,९६५, प.बंगाल १३,५०० व कर्नाटकात १३,०५६ आत्महत्या झाल्या. या राज्यांचे अनुक्रमे प्रमाण १३.५%, ११.५%, ९.१%, ८.२% आणि ८% इतके असल्याचे अहवालात म्हटले आहे. या पाच राज्यांमध्येच देशातील आत्महत्यांच्या ५०.४ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. उर्वरित ४९.६ टक्के आत्महत्येच्या घटना इतर २३ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

आत्महत्यांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी देशात एक लाख लोकसंख्येमागे एका व्यक्तीची आत्महत्या हा मापदंड व्यापकपणे स्वीकारण्यात आला आहे. २०२१ मध्ये संपूर्ण भारतातील आत्महत्यांचे प्रमाण १२ इतके होते. अंदमान आणि निकोबार या बेटांवर आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण (३९.७) नोंदवले गेले. त्यानंतर सिक्कीम (३९.२), पुडुचेरी (३१.८), तेलंगण (२६.९) आणि केरळ (२६.९). या राज्यांचा क्रम येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.