सांगली : शहरातील अत्यंत गजबजलेल्या सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या सोन्याच्या शोरूमवर भरदिवसा रविवारी दुपारी ३ वाजता आठ दरोडेखोरांनी गोळीबार करत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी जवळपास कोटी रुपयांची लूट केली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला. सांगली पोलिसांनी जिल्ह्याची तातडीने नाकेबंदी केली आहे. याप्रकरणी पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
सांगली-मिरज हमरस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात व जिल्हा पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रिलायन्सच्या शोरूममध्ये रविवारी दुपारी ३ वाजता दरोडेखोर ग्राहक म्हणून शिरले.
आठ दरोडेखोरांनी आत प्रवेश करून रिलायन्सच्या व्यवस्थापकाला पोलिस असल्याचे सांगत दुकानची तपासणी करायची म्हणत धमकावले. त्यानंतर शोरूममधील ग्राहकांना बाहेर काढले. त्याच वेळी दुकानातील सुमारे २० कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध करताच त्यांच्यावर गोळीबार केला. यात दुकानातील एक ग्राहक जखमी झाला. दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच पोलिसांना माग काढता येऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जमा होणारे ५ पैकी ४ उपकरणेही दरोडेखोरांनी पळवली आहेत.
रिलायन्सच्या शोरूममधील जवळपास १५ किलो सोने दरोडेखोरांनी पोत्यात भरले. तसेच जवळपास दीडशे विविध रत्ने पेटीत टाकून पुन्हा गोळीबार करत पसार झाले. १०-१२ किलो सोने व ३-४ कोटींची रत्ने दरोडेखोरांनी लुटली आहेत. रात्री उशिरापर्यंत दुकानात शिल्लक असलेल्या किरकोळ स्टॉकची मोजणी सुरू होती. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेलींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोर एका स्कॉर्पिओ गाडीतून घटनास्थळी आले होते. दरोडेखोर सोलापूर किंवा कर्नाटकाकडे पळाले असल्याचा अंदाज आहे.