अहमदनगर : राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे पोलिस दलातून हकालपट्टी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉलल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. मुलांची सुटका करण्यासाठी गेलेले श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केला. गोळीबाराच्या या घटनेत पोलीस उपविभागीय अधिकारी मिटके थोडक्यात बचावले आहेत.
ही घटना आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. आरोपी सुनिल लोखंडे या सहाय्यक निरीक्षकाची पोलिस दलातून काही वर्षांपुर्वी हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तो पुर्वी पुणे शहर पोलिस दलात तसेच एसपीयुमध्ये कार्यरत होता. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नानोर यांच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हाल्वर रोखून धरले होते. नानोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईलवरुन ओळखीच्यांना या घटनेची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मिटके हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरु होते. अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली, ती उपधीक्षकांच्या डोक्या जवळून गेली. मिटके हे यामध्ये थोडक्यात बचावले.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखळ झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने खंडणी मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी हे कृत्य आरोपीने केल्याचे समजले आहे.