मुंबई : करोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्यपींच्या मद्यसेवनामुळे राज्याच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा झाला आहे. १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसूलात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत महिन्यांत राज्याच्या तिजोरीत सुमारे १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
करोनाकाळात राज्यातील मद्यविक्री थंडावली होती. मात्र आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मद्यविक्रीही जोमात असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत ३४.५ कोटी लिटर देशी मद्याची विक्री झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या याच काळात राज्यात २५ कोटी लिटर देशी मद्य विकले गेले होते. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विदेशी मद्याची २३.५ कोटी लिटर विक्री झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या याच काळात १७.५ कोटी लिटर विदेशी मद्याची विक्री झाली होती.
करोनाकाळात बीअरची विक्री मोठ्या प्रमाणात घटली होती. आता बीअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या आठ महिन्यांत२३ कोटी लिटर बीअरची विक्री झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या याच काळात २१ कोटी लिटर बीअरची विक्री झाली होती. उच्चभ्रू वर्गाची पसंती असणाऱ्या वाइनलादेखील मागणी वाढल्याचे दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या काळात राज्यात ८८ लाख लिटर वाइनची विक्री झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या याच काळात ६६ लाख लिटर वाइन विकली गेली होती.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यात मद्यविक्रीतून १७,११७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या केवळ नऊ महिन्यांत १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे यंदा मद्यविक्रीतून २२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, अशी आशा उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.