कोल्हापूर: शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा ही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या यादीत राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सत्तार यांनी या घोटाळ्याशी आपला आणि आपल्या मुलींचा काहीच संबंध नसल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मुली 2020मध्ये या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत, असं सत्तार यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र, या घोटाळ्यावरून विरोधकांनी आता सत्तारांना लक्ष केलं आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही सत्तार यांच्यावर टीका केली आहे. आता शिंदे सरकार सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी खपवून जातात, असंही ते म्हणाले.
टीईटी घोटाळ्यावरून आता औरंगाबादचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. माझ्याकडे सत्तार यांची फाईलच आहे. त्यांचे घोटाळे बाहेर काढले जातील. एक सहकारी म्हणून मी इतके दिवस शांत होतो. आता मी शांत बसणार नाही. त्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढणार आहे, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. टीईटी घोटाळ्यात अजून किती मुले मुली आहेत याची चौकशी झाली पाहिजे. सत्तार यांच्या अनेक शाळा आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. सत्तार यांना मंत्रिपद हवे असेल तर त्यांनी शांत बसावे. अधिक बडबड करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच भाजप आता सत्तार यांना मंत्रिपद देणार का? असा सवालही त्यांनी केला.