जळगाव : शहरासह जिल्ह्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारातच घेत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच खडसावले आणि अवैध धंदे बंद करण्याची ताकीद दिली.
जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्थ अधिक असून पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. असे असताना गेल्या वर्षभरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून काही ठिकाणी राजकारण्यांचे लागेबांधे आहेत. जिल्ह्यात पोलिस अधिकारी कोणतीही तक्रार मांडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत कोणतीही दाद देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली.
उपमुख्यमंत्र्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच खडसावले. इतकेच नव्हे तर कुणाच्याही आशीर्वादाने सुरू असलेले अवैद्य धंदे बंद न झाल्यास जळगावात येऊन पत्रकारपरिषद घ्यावी लागेल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अवैध धंदे बंद झाल्यानंतर मुंबईला भेटायला येण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुढील चित्र नक्की बदललेले दिसेल अशी अपेक्षा आहे