सातारा : सातारा-पंढरपूर एसटी बसवर पिलीव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दगडफेक केली. यात बस चालक जखमी झाला.
मंगळवारी रात्री पंढरपूरमधून प्रवासी घेऊन एसटी बस साताऱ्याकडे येत होती. बस पिलीव घाटातून मार्गस्थ होत असतानाच 10 ते 15 हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली. यात बसची पुढील काच फुटून चालक जखमी झाला. धोका जाणवल्याने चालकाने बस न थांबवता वेगात सुरू ठेवली.
एसटी चालकाने घाटातील धोक्याची माहिती इतर वाहन चालकांना देणे सुरू केले. यामुळे घाटातील वाहतूक काही वेळातच ठप्प झाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस आले आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. घाटात शोध घेतल्यानंतर घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. बसवरील दगडफेक लुटमारीच्या उद्देशाने झाल्याची चर्चा असली तरी त्याला अद्याप दुजोरा मिळाला नाही.