पत्नी, मुलासह उद्योजकाची आत्महत्या; बलात्काराचा गुन्हा होता दाखल

0

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील तरुण उद्योगपती तथा अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना शनिवारी सकाळी उजेडात आली. शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. महिनाभर ते तुरुंगातही होते. या प्रकरणात झालेल्या नामुष्कीमुळे त्यांनी अखेर आत्महत्या करून आपला जीवनप्रवास थांबवला.

यासंबंधीच्या माहितीनुसार, संतोष शिंदे यांनी लहान वयातच आश्चर्यकारक भरारी घेत अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत त्यांनी तेल उत्पादन, व्यायाम शाळा, ‘विराज फुड्स’च्या माध्यमातून महाराष्ट्रासह कर्नाटकातही उद्योग विस्तारला होता. त्यामुळे ते आत्महत्या करून आपला जीवनप्रवास थांबवतील असे कुणालाही वाटले नव्हते. पण शुक्रवारी रात्री त्यांनी गडहिंग्लज येथील आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासह आपली जीवनयात्रा थांबवली.

शनिवारी सकाळी संतोष शिंदे यांनी बराचवेळ आपल्या बेडरुमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना शिंदे, त्यांच्या पत्नी व मुलाचा मृतदेह आढळला. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या. त्यामुळे त्यांनी विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी त्यांना महिनाभर तुरुंगातही रहावे लागले होते. तेव्हापासून ते तणावात होते. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी उद्योगात पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना अपयश आले. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या वडिलांचेही अलिकडेच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.