सर्वोच्च न्यायालयाचा निणर्य संभ्रमात टाकणारा : राज ठाकरे

0

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे निरीक्षण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना नोंदवले. तसेच कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत, म्हणून हे सारे उद्भवले, असा टोलाही त्यांनी हाणला.

राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, अनेक प्रश्नांवर उत्तरे देणे टाळले. हा लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठीचा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निर्णय बराच संभ्रमात टाकणारा आहे. कोर्टाकडून, पोलिसांकडून जेव्हा मला नोटीसा येतात. ती भाषा वाचल्यानंतर कळत नाही की, आपल्याला सोडले आहे की, अटक केले आहे. ती इतकी कॉम्प्लिकिटेड भाषा असते.

ठाकरे म्हणाले की, न्यायालय म्हणते सगळी प्रोसेस चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष म्हणून समजला जाणार नाही. बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. आता निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव त्या गटाकडे दिले आहे. त्याचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालय एक यंत्रणा आहे. आता सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या गोष्टीकडून निवडणूक आयोग काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत यामुळे या गोष्टी सगळ्या भयंकर संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. सगळी धूळ खाली बसल्यानंतर आपल्या सगळ्याला कळेल नक्की काय झाले ते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे होते, असा सल्ला दिला होता. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिले पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले म्हणून आज हे सगळे उभे राहिले. त्यामुळे आपण कुठल्या पदावर बसलो आहोत ते पाहून जपून राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.