मुंबई : अजित पवारांनी आज केलेल्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळे यांनी एक ट्ववीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा 13 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या पत्रकारांच्या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चं नाव घेतले आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी ‘प्रेरणास्थान’ असं एका शब्दात आपली भावना मांडली आहे. सुप्रिया सुळेंचे हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
खरं तर, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने शरद पवारांना विचारलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? यावर शरद पवारांनी स्वत:चा हात उंचावत आणि स्मितहास्य करत ‘शरद पवार’ असं उत्तर दिले आहे. हाच व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी ट्विट केला असून ‘प्रेरणास्थान’ असे कॅप्शन लिहिले आहे.
दुसरीकडे, अजित पवारांच्या बंडखोरीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांबरोबर गेलेल्या काही सहकाऱ्यांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आमची वेगळी भूमिका आहे, असं त्यांनी मला सांगितलं आहे. आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही.