नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत. भारताच्या ज्युदोपटू सुशीला देवीला 48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सुशीलाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विजय यादवने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. त्याने सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडोलिडसचा पराभव केला.
रात्री उशिरा वेटलिफ्टर हजरिंदर कौर हिने महिलांच्या 71 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. तिने स्नॅच फेरीमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कफेरीमध्ये 119 किलो वजन उचलले. तिने एकूण 212 किलो वजनासह तिसरे स्थान पटकावले. इंग्लंडच्या सारा डेव्हिसने सुवर्ण आणि कॅनडाच्या अॅलेक्सिस एसवर्थने रौप्यपदक जिंकले. आता या मेगा स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण 8 पदके आहेत.
दुसरीकडे पुरुष हॉकीमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेला सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. भारताने 3-1 अशी आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत बरोबरी साधली. भारताकडून मनदीप सिंगने दोन गोल केले असून ललित उपाध्याय आणि हरमनप्रीत सिंगने 1-1 गोल केला आहे.
सध्या वेटलिफ्टिंगमध्ये महिलांची 71 किलोग्रॅम गटातील स्पर्धा सुरू आहे. भारताच्या हरजिंदर कौरने स्नॅचमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 93 किलो वजन उचलले.इंग्लंडची सारा डेव्हिस 103 किलो वजनासह आघाडीवर आहे.