T20 WC 2022 इंग्लंड विश्वविजेता! 5 गडी राखून पाकिस्तानला हरवले

0

मेलबर्न : मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने विश्वविजेता झाला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 138 धावांचे आव्हान 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 6 चेंडू बाकी असताना पूर्ण करत इंग्लंडने वर्ल्डकप उंचावला. इंग्लंडने 2010 नंतर पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच 1992 मध्ये वन डे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची इंग्लंडने 30 वर्षांनी सव्याज परतफेडही केली.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 138 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. शाहीनशाह आफ्रिदी आणि हारिस रौफच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर इंग्लंडची त्रेधातिरपीट उडाली. सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावलेल्या अॅलेक्स हेल्सला शाहीनशाह आफ्रिदीने अवघ्या 1 धावांवर बाद केले. त्यानंतर रौफने फिलीप सॉल्टला 10 आणि कर्णधार जोस बटलरला 26 धावांवर बाद करत इंग्लंडची अवस्था 3 बाद 45 अशी केली.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या बेन स्टोक्स याने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. त्याने हॅरी ब्रुकसोबत आधी छोटी पण महत्त्वाची भागिदारी केली. ब्रुक 20 धावांवर बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि मोईन अली यांनी मैदानावर शड्डू ठोकत आधी एकेरी-दुहेरी धावसंख्येवर आणि नंतर चौकार-षटकारांची आतषबाजी करत इंग्लंडला विजयासमीत पोहोचवले.

इंग्लंडला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना मोईन अली 19 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विजयाची औपचारिकता स्टोक्स आणि लिविंग्स्टनने पूर्ण केली. स्टोक्सने अखेरपर्यंत नाबाद राहत 55 धावा केल्या. पाकिस्तानकडून रौफने सर्वाधिक 2, तर शादाब खान, शाहीनशाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीन ज्यूनियरने प्रत्येकी एक बळी घेतला.

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला 8 बाद 137 धावांवर रोखले. पाकिस्तानकडून फक्त चार फलंदाज दुहेरी धावांचा आकडा ओलांडू शकले. मसुदने सर्वाधिक 38, तर बाबर आझमने 32 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून सॅम करणनने सर्वाधिक 3, तर आदिल राशिद आणि क्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर बेन स्टोक्सला एक बळी मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.