मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक बंडखोर आमदार हे माघार घेण्याच्या मनस्थिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याची प्रचिती शुक्रवारी मुंबईत तर आज पुण्यात आली. पुण्यातील शिवसैनिकांनी आज सकाळी आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर शिवसेनेचे आमदार आंबादास दानवे यांनी या कृत्याचे समर्थन केले आहे. आता शिवसेना अशाच प्रकारे गद्दारांना ‘वेचून वेचून धडा शिकवणार’ असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.
आंबादास दानवे म्हणाले, शिवसैनिकांनी या आमदारांना रक्ताचं पाणी करुन निवडून दिले होते. परंतु त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता अशा पद्धतीने आमदार पक्षाच्याविरोधात जात असतील, बंडखोरी करणार असतील तर शिवसैनिकांच्या भावना कोणीही दाबून ठेऊ शकत नाही. येणाऱ्या काळात शिवसैनिक हे आणखी आक्रमक होतील, असे दानवे यांनी सांगितले.
शिवसेनेचे आमदार परत येतील या आशेने चार दिवस शिवसैनिक शांत होते. अंबादास दानवे यांनीही कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. परंतु आज बंडाच्या पाचव्या दिवशी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दानवे यांनीही ‘जशास तसं उत्तर देऊ’ अशा आशयाची फेसबुक पोस्ट केली. त्यात त्यांनी पुण्यातील शिवसैनिकांच्या कृत्याचे पूर्णपणे समर्थनही केले आहे. आमच्या पक्षप्रमुखाला दु:ख देता, मग तुम्हाला काय सुखात राहून देऊ का आम्ही? आता बंडखोरांना अशाच पद्धतीने उत्तर मिळेल, असेही दानवे यांनी म्हटले.
आंबादास दानवे यांनी शिवसैनिक सर्वच बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक होणार नाहीत, असे सांगितले. आम्ही निवडून-निवडून एकएकाला लक्ष्य करत आहोत. कोण पक्षात पुन्हा येऊ शकतं आणि कोण नाही, हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता आम्ही वेचून वेचून बंडखोरांमधील गद्दारांना धडा शिकवायला सुरुवात केली आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.