पंढरपूर : कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ होण्यासाठी शुक्रवार २८ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत मंदिर २४ तास सुरू ठेवण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. कार्तिक एकादशी सोहळा ४ नोव्हेंबर रोजी होत असून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे चार-पाच लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. दररोज ३५ ते ४० हजार भाविकांना पददर्शन तर ४० ते ४५ हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे.
राजोपचार बंद, नित्योपचार चालू राहणार : सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री विठ्ठलास मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती इत्यादी राजोपचार १३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. मात्र नित्यपूजा, महानैवेद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरू राहतील.