कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सध्या तणाव असून शिवसेना आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने आले आहेत. बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज लावल्याने वाद निर्माण झाला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा हा ध्वज तात्काळ हटवला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
कन्नक रक्षक संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर बेकायदेशीरपणे लाल पिवळा ध्वज लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा रद्द झाला होता. मात्र कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले असून कर्नाटकमध्ये घुसून महापालिकेसमोर भगवा ध्वज फडकावणार असा निर्धार केला आहे.
शिवसैनिकांना रोखण्यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटदेखील झाल्याचं पहायला मिळालं असून सध्या तणावाचं वातावरण आहे.
कर्नाटकच्या ज्या भागांमध्ये मराठीभाषक लोक बहुसंख्येने राहतात, ते भाग राज्यात सामील करून घेण्यास आपले सरकार वचनबद्ध असून, यासाठी शहीद झालेल्यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असं उद्धव ठाकरे रविवारी म्हटलं होतं.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या संवेदनशील मुद्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा मुख्यालयासह कर्नाटकच्या काही भागांत सोमवारी निदर्शने करण्यात आली. पक्षभेद विसरून राजकीय नेत्यांनी ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. ‘कर्नाटकची एक इंचही भूमी महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी केवळ राजकीय उद्दिष्टासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणे सोडून द्यावे’, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.