नाशिक : प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक मध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे-जाधव असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्हे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सुवर्णा यांचा मृतदेह एका गाडीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वाडीवर्हे परिसरात एका वाहनात हा मृतदेह आढळून आला आहे. तर ज्या वाहनात हा मृतदेह आढळून आला आहे ते वाहन देखील पूर्णपणे आगीत जळून खाक झाले आहे. वाझे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.
कालच सुवर्णा वाझे-जाधव यांच्या पतीने अंबड पोलिसांत मिसिंगची पोलिसांत तक्रार दिली होती. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मनपा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नेमकी ही दुर्घटना आहे की घातपात त्या दृष्टीने तपास सुरू आहे, मात्र एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह अश्या अवस्थेत आढळल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.