नाशिक : विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली असून तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिकमध्ये राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे आणि नाशिक पोलीस त्यांना अटक करण्यासाठी चिपळूनकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त राष्ट्रपती आहेत की पंतप्रधान असा ? असा सवाल करून मी नॉर्मल माणूस नाही असे ठणकावले होते. त्यानंतर नाशिक चे पोलीस आयुक दीपक पांडे यांनी नारायण राणे यांनी जे काही सांगायचे ते कोर्टात सांगा, उलट ऐकवत अटक होणार असल्याचेच सांगितले आहे.
यासंदर्भात एन आय ए या वृत्त संस्थेशी बोलताना पांडे म्हणाले की, राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही.
या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे. गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.