नवी दिल्ली : “हा संसर्ग फार धोकादायक आहे. जगभरात अत्यंत वेगाने याचा फैलाव झाला आणि पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी यामुळे संकट निर्माण झालं. पण हे सर्वात मोठं संकट आहे म्हणण्याची गरज नाही. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. परंतु इतर नव्याने येणाऱ्या आजारांच्या तुलनेत सध्याची मृत्यूची संख्या कमी आहे. ही आपल्या सर्वांना जागं करणारी परिस्थिती आहे”, असे मोठे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकालीन प्रमुख मायकल रायन यांनी केले आहे.
मायकल रायन पत्रकार परिषदेत बोलत होते. रायन पुढे म्हणाले की, “करोना संकटामुळे अनेक बलाढ्य देशांसमोर संकट निर्माण झालं होतं. अमेरिकासारख्या देशालाही करोना संकटाचा मोठा फटका बसला असून अर्थव्यवस्थेचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. अजूनही करोना संकट टळलेलं नसून अनेक देश याचा सामना करत आहेत. करोनाचा संसर्ग जगभरात अत्यंत वेगाने पसरला होता. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी करोनाचा फटका बसला आहे. पण हे संकट सर्वात मोठं आहे म्हणण्याची गरज नाही”, असे मत रायन यांनी मांडले.
करोनाच्या नव्या प्रजातीने जगभरात पुन्हा पावले पसरण्यास सुरूवात केली आहे. जगात आतापर्यंत १९ लाख लोकांचा करोनाने मृत्यू झालेला आहे. करोना संकट हे मोठं संकट नाही. परंतु, या करोनाच्या या परिस्थितीने भविष्यात उद्भविणाऱ्या संकटाचे गांभीर्य दर्शविणारा इशारा, असे रायन यांनी सांगितले आहे.