लोकसभा निवडणुकीआधी देश नक्षलवादमुक्त होईल : गृहमंत्री शहा

0

छत्तीसगड : गेल्या दशकभरात नक्षल हिंसाचारात घट झाल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, २०२४च्या लोकसभा निवडणुकीआधी देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा शनिवारी केली.नक्षलग्रस्त छत्तीसगडमधील कोर्बा शहरातील सभेत शहा बोलत होते.

या वर्षी छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने शहा यांनी या सभेत निवडणुकीचे जणू रणिशगच फुंकले. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन शहा यांनी मतदारांना केले. २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी यावेत असे वाटत असेल तर भाजपलाच मतदान करा, असे शहा म्हणाले. राज्यातील वाढता भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला काँग्रेसचे बघेल सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना २००९ मध्ये नक्षल हिंसाचाराच्या घटनांची संख्या २,२५८ एवढी होती. ती २०२१ मध्ये ५०९ पर्यंत खाली आली, असे शहा म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारने केवळ शस्त्रे हाती घेणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील तरुणांना शिक्षण आणि रोजगार मिळावा याची हमी दिली नाही तर शस्त्रे बाळगणाऱ्यांचे उच्चाटन करण्यासाठीही काम केले, असे शहा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बघेल यांनी गेल्या पाच वर्षांत काय केले, असे विचारले तर ते काय उत्तर देतील, असा मला प्रश्न पडतो. वास्तविक त्यांनी राज्यासाठी काहीही केले नाही. त्यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढवण्यासाठीच काम केले, असा आरोप शहा यांनी केला.

नरेंद्र मोदी सरकारने शस्त्रे हाती घेणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील तरुणांना शिक्षण आणि रोजगार मिळावा याची हमीच दिली नाही तर शस्त्रे बाळगणाऱ्यांचे उच्चाटन करण्यासाठीही काम केले.
अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.