नवी दिल्ली : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील निदर्शने करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी तिन्ही सेनांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली. यादरम्यान लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, कोचिंग ऑपरेटर्सनी ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने केली. तरीही ‘अग्निपथ’ योजना मागे घेतली जाणार नाही.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे एक प्रगतीशील पाऊल आहे. त्यात बदल शक्य आहेत, परंतु माघार नाही. यासोबतच पुरी म्हणाले की, ”एफआयआरमध्ये आंदोलकांची नावे आल्यास संरक्षण दलाचे त्यांच्यासाठी दरवाजे बंद होणार आहेत.”
लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, की ”जर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला गेला असेल, तर ते सैनिकी भरतीमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज भरताना लिहायला सांगितले जाईल, की ते जाळपोळग्रस्त आंदोलनात सहभागी नव्हते. त्यानंतर त्यांची पोलिस पडताळणी केली जाईल. लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, ”लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेच्या टाइमलाइनवरही माहिती देण्यात आली होती. तत्पूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सकाळी तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट घेतली होती.”
पुरी यांनी आवाहन केले, की, सैन्याचा पाया शिस्त आहे. जे शिस्त पाळतात त्यांनी आंदोलकांमध्ये वेळ वाया घालवू नका. जे काही तरुण इकडे तिकडे फिरत आहेत, भटकत आहेत. ते वेळ वाया घालवत आहेत. कारण शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे कोणालाही सोपे नसते. त्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटींवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची विनंती देखील केली आहे.