‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका; राज्यात पुन्हा कडक निर्बंध

0

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या वाढत्या संसंर्गाला रोखण्यासाठी राज्यसरकारने कोरोना निर्बंधांमध्ये पुन्हा वाढ केली आहे. आज (31 डिसेंबर 2021) रात्री 12 वाजल्यापासून हे निर्बंध अंमलात येणार आहे. राज्यसरकारच्या वतीने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी गुरुवारी (३० डिसेंबर) टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढत्या रुग्ण संख्यमुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. तर तज्ज्ञांनीही ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. हे पाहता राज्यसरकारने शिथील केलेल्या कोरोना निर्बंधात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या वतीने जारी परिपत्रकात निर्बंधाची माहिती देण्यात आली आहे. बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. तर दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा 50 करण्यात आली आहे.

परिपत्रकातील माहितीनुसार, अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता जास्तीत जास्त 20 असेल. राज्यातील पर्यटन स्थळांवर, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगणे या सारख्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला 24 डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेले सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास जमावबंदी लागू करता येईल.हे सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील.

असे आहेत निर्बंध-
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांना परवानगी.

अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी.

पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहणार.

Leave A Reply

Your email address will not be published.