मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लहान मुलांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर शाळकरी मुलांमध्ये हे प्रमाण वाढले असून मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. आता या शाळांतील इतर विद्यार्थांचीही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या 35 विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते आठवी या दरम्यानचे 25 विद्यार्थी तर नववी ते बारावीपर्यंतचे एकूण 10 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.
साताऱ्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयातील 23 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत. सेवागिरी विद्यालयात पहिल्यांदा एक विद्यार्थीनी आजोबांमुळे कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या शाळेतील आणखी पाच विद्यार्थी पॉझिटीव्ह आढळले होते. तिसऱ्या टप्यात आणखी तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले. चौथ्या टप्यात आणखी 14 विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत सेवागिरी विद्यालयातील एकूण 23 विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या टप्यात पाचवी ते आठवी या वर्गातील हे विद्यार्थी आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काल काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर काल आणि आज दोन दिवस झालेल्या तपासणीत 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत. हॉस्टेलला प्रशासनाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि अधिकची चौकशी सुरू केली आहे.
लातूर शहरातील एमआयडीसी भागातील खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परवानगी नसतानाही शहरातील 170 पेक्षा जास्त खासगी हॉस्टेल सुरू असल्याने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.