मेहुल चोक्सीला आणायला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

0

रोसेऊ : पीएनबी बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डॉमिनिका येथील स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारला आहे. बुधवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मेहुल चोक्सीला आधी स्थानिक न्यायालयात हजर करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी चोक्सीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. तेथे मेहुल चोक्सीचा जामीन नाकारण्यात आला. तर भारतातून चोक्सीला आणायला गेलेले पथक रिकाम्या हाती पथकाने आले आहे.

मेहुल चोक्सीने केलेली याचिका वैध नसून, त्याला भारताकडे सोपवावे, अशी स्पष्ट भूमिका डोमिनिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. मेहुल चोक्सीला २३ मे रोजी डॉमिनिका पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगात चोक्सीची तब्येत बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथूनच चोक्सी डॉमिनिकाच्या न्यायालयात हजर झाला होता. निळ्या रंगाची टी-शर्ट आणि शॉर्ट्स अशा कपड्यात मेहुल चोक्सीला व्हीलचेअरवर आणण्यात आले.

पोलिसांनी मेहुल चोक्सीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर डॉमिनिकाच्या सरकारी वकिलांनी चोक्सीला जामीन नाकारावा अशी मागणी केली. चोक्सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच चोक्सीच्या प्रत्यार्पण करण्याबाबत भारत सरकारशी चर्चा सुरू आहे, यासाठी त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला.

बचाव पक्षाच्या वकिलांनी चोक्सीला बेकायदेशीर अटक केली असल्याचा दावा केला. जामिनासाठी १० हजार ईस्टर्न कॅरेबियन डॉलर देण्याची आणि बेकायदा पदेशात प्रेवश केला म्हणून दुप्पट दंड भरण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र त्याचा जामीन नाकारण्यात आला. याप्रकरणाची पुढील सुनावणी १४ जून २०२१ रोजी होणार आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी फरार झाले आहेत. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. तर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये लपून बसला होता. मात्र, २३ मे रोजी मेहुल चोक्सी पोलिसांच्या हाती लागला. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता. चोक्सीचा ताबा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून डॉमिनिका आणि अँटिग्वा सरकारशी चर्चा सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.