पुणे : जगातील सर्वात खडतर अल्ट्रा मॅरेथॉनपैकी एक म्हणून ओळखली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील 90 किमी अंतराची कॉम्रेड्स मॅरेथॉन (डाऊन) शर्यत शहरातील पीसीएमसी रनर्सचे भूषण तारक, भरत गोळे आणि डॉक्टर प्रकाश ठोंबरे या तीन धावपट्टूनी रविवारी (दि. 28 ऑगस्ट) 12 तासाच्या आत पूर्ण केले.
पीसीएमसी रनर्सचे भूषण तारक, भरत गोळे आणि डॉक्टर प्रकाश ठोंबरे यांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. 24 ऑगस्ट रोजी हे तिघे डर्बनसाठी रवाना झाले होते. 28 ऑगस्ट रोजी रविवारी पहाटे साडेपाच वाजता पीटरमॅटिझबर्ग शहरातून शर्यतीला सुरुवात झाली असून शेवट डर्बन शहरातील मोझेसमाभिदा स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता झाला. या तिघांपैकी भूषण तारक यांनी 2019 मध्ये या शर्यतीत भाग घेतला असून त्यांची हि दुसरी वेळ होती.
धावपटू तारक म्हणाले, कि ”कॉम्रेड्स मॅरेथॉन शर्यत ‘अप’ आणि ‘डाउन’ या दोन प्रकारे भरवली जाते. यंदाची ‘डाऊन’ मॅरेथॉन आहे. 90 किमीचे अंतर बारा तासाच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य धावपटूसमोर ठेवले आहे. शर्यतीच्या मार्गावर तीन मोठया टेकड्या आणि पन्नास लहान टेकड्या असून स्पर्धकांना सतत चढावर धावावे लागते. मार्चमध्ये अपघात झाल्यामुळे ऑपरेशन करावे लागले व ट्रेनिंगला पुरेसा वेळ देता आला नाही. पण, जून-जुलै महिन्यात पुन्हा तयारीला लागलो व शर्यत 11 तास 32 मिनिटात पूर्ण करू शकलो. या रनसाठी 240 किमीची रणवारी, पुणे अल्ट्रा, 161 किमी बॉर्डर रनचा अनुभव कामी पडला.
49 वय असणारे डॉक्टर प्रकाश बाजीराव ठोंबरे यांनी हि शर्यत 11 तास 04 मिनिटात पूर्ण केली. कॉम्रेड्स मॅरेथॉन धावण्याची त्यांची हि पहिलीच वेळ. ते अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथे प्राध्यपक म्हणून रुजू आहेत. त्यांना 2019 मध्ये सुपर रँडॉर्निअर हा सायकलिंगमधील किताब मिळाला आहे. तसेच, त्यांनी 100 किमी अंतराची पुणे अल्ट्रा मॅरेथॉन व 50 किमी अंतराच्या विविध स्पर्धेत सहभाग घेतला आहे. डॉक्टर ठोंबरे सांगतात, कि ”कॉम्रेड्सच्या सरावाला जानेवारीत सुरुवात केली. भंडारा डोंगर, दुर्गादेवी टेकडी, सिंहगड, लवासा आणि लोणावळा येथे धावण्याचा सराव केला होता. शर्यत पूर्ण झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे असे त्यांनी सांगितले.
52 वय असणारे भरत गोळे हे भारत बाहेरील ऑइल आणि गॅस उद्योगमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. सततच्या प्रवासामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. त्यांचे वजन 103 किलोपेक्षा अधिक झाले. चांगल्या आरोग्यासाठी 2018 मध्ये त्यांनी धावण्यास सुरुवात केली आणि 73 किलोवर वजन आणले. भरत यांनी कॉम्रेड्स मॅरेथॉन 11 तास 52 मिनिटात पूर्ण केली. कॉम्रेड्ससाठी त्यांनी मोटिवेटचे अतुल गोडबोले यांच्याकडे मार्गदर्शन घेतले होते. कॉम्रेड्स मॅरेथॉन बद्दल सांगतात, कि ”हि शर्यत तुमचे आयुष्य बदलून टाकते. लांब पल्ल्याचे अंतर धावणाऱ्याने आयुष्यात एकदा तरी हि शर्यत धावावी.” पुढे आयर्नमॅन ‘किताब पटकवण्याचा त्यांचा मानस आहे.
भूषण तारक यांनी दक्षिण आफ्रिकेतील आणखी काही अनुभव सांगितले. त्यातली मुख्य म्हणजे फिनिक्स डर्बन येथे असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या घराला त्यांनी भेट दिली. तसेच गांधींनी याच ठिकाणी पहिल्या सत्याग्रहाची सुरुवात केली होती. या वेळेस 82 वय असणाऱ्या इला गांधी (महात्मा गांधी यांची नात) यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांनी शर्यतीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या.