औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत आहे. सरकार, राज्यकर्त्यांना व राजकीय लोकांना याबाबत काहीच वाटत नाही; अशी खंत व्यक्त करत मराठा मोर्चा संघटनेतील एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन केले.
दत्ता भोकरे पाटील असे या तरुणाचे नाव आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्याना कुणाचे कुणाशी काही देणे-घेणे नाही. ते स्वत:च्या पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत. आज साष्टी पिंपळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे सुरु असलेल्या आंदोलनाला समाजाचे पाठिंबा दिला, त्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. पुढाकार घेतला त्याबद्दल समन्वयकांचेही धन्यवाद. मी लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे…’ असं म्हणत भावनिक होत त्याने फेसबुक लाईव्ह बंद केले आणि त्यानंतर विष प्राशन केले.
दत्ता भोकरे याने लाईव्ह करताना काही जणांना टॅग केले होते. लाईव्ह येताना त्याने डोक्यावर मराठा क्रांती मोर्चाची टोपी घातली होती. ते पाहून क्रांती चौक पोलिसांना याबाबत माहिती दिली. दत्ता भोकरे हा अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचा शहर प्रसिद्धी प्रमुख आहे. तसेच तो शहरातील शिवाजीनगरचा रहिवासी आहे.