कोल्हापूर : शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे देखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हे देखील या मार्गावर असल्याचे समजतेय.
काही दिवसांपूर्वी खासदार मंडलिक यांनी शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिले ते सोनंच असं वक्तव्य केलं होतं. जवळपास तीन वर्षापूर्वी संजय मंडलिक यांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन खासदार आहेत. या दोन्ही खासदारांनी पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले होते. खासदार मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज दुपारी कागल तालुक्यातील हमीदवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोल्हापूरमधून राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेनेचे नेते नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मंडलिक आणि माने या दोन्ही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी संजय मंडलिक अनुपस्थित होते. मात्र आपण पूर्वपरवानगीने गैरहजर होतो असेही त्यांनी सांगितले. तर धैर्यशील माने यांनी मातोश्रीवरील बैठकीत हजेरी लावली.
तर कोल्हापूरात झालेल्या शिवसेना मेळाव्यात अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर या दोन्ही खासदारांबाबत चर्चा सुरु झाल्या.