चिपळूण मध्ये एटीएम फोडून पसार झालेले चोरटे गोव्यात जेरबंद
24 तासाच्या आत पोलिसांनी आणला गुन्हा उघडकीस
चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम फोडून 14 लाख 60 हजार 500 रूपयांची चोरी करण्यात आली. या टोळीला चिपळूण पोलिसांनी गोव्यात जाऊन पकडले आहे. त्यांच्याकडील 4 लाख 5 हजार 290 रूपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली. 24 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले की, गुन्ह्याची माहिती मिळताच 12 तपास पथके तैनात करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, डॉ.सचिन बारी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक हेमंतकुमार शहा, चिपळूणचे रवींद्र शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी, सुजित गडदे, रत्नदीप सांळुखे, मनोज भोसले, तुषार पाचपुते, संदीप पाटील, अमोल गोरे उपनिरीक्षक शाम आरमाळकर या आणि पोलिस पथकाने मेहनत घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
एटीएम मध्ये मास्क घातलेल्या दोन व्यक्ती दिसल्या त्या अनुषंगाने तसेच तांत्रिक बाजू वापरून आरोपींचा शोध घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी इरफान आयुब खान (39, रा. कलिना मुंबई, मूळ उत्तरप्रदेश), वासिफ साबिर अली (25, रा.संगमनगर एन्टॉप हिल मुंबई,मूळ उत्तर प्रदेश) आणि शादाब मकसूद शेख़ (35, रा.कलिना मुंबई,मूळ उत्तर प्रदेश) या तिघांना गोव्यात अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 4 लाख 5 हजार 290 रूपयांची रोकड जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार आणि तिघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपी आणि उर्वरित रोकड़ हस्तगत करू असा विश्वास डॉ.गर्ग यांनी व्यक्त केला.
या टोळीने काही दिवसांपूर्वी एटीएम मशीनची रेकी केली होती.त्यानंतर त्यांनी चिपळूणातील एटीएम निवडले.गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडण्यात आले.आरोपी शादाब शेख याने गॅसकटरने हे मशीन फोडले आहे तसेच चौकशीत आरोपींनी ९ ऑगस्ट रोजी पुण्यातील एटीएम मशीन फोडून सात लाख रूपये चोरल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी दिली. तसेच तपासी पथकाला रोख 25 हजार रूपयांचे इनाम जाहीर करण्यात आले.